मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : मिर्झापूर - प्रयागराज रस्त्यावरील विंध्याचल पोलीस स्टेशन हद्दीतील महोखर गावाजवळ एका ड्रायव्हरने बोलेरो गाडीत बसलेल्या वराच्या काकांची हत्या केली. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह ठेवून मिर्झापूर - प्रयागराज महामार्ग रोखून धरला. संतप्त नातेवाईकांनी आरोपी ड्रायव्हरच्या अटकेची मागणी केली आहे.
चालकावर गुन्हा दाखल : घटनास्थळी पोहोचलेले न्यायाधिकारी परमानंद कुशवाह यांनी गावकरी व कुटुंबीयांची तासभर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना कारवाईचेही आश्वासन दिले. मात्र, नातेवाइकांनी ते मान्य केले नाही. माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा अधिकारी शिवप्रताप शुक्ला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत प्रजापती घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर त्यांनी त्यांची तक्रार घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी रस्ता मोकळा केला. सध्या पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील जाममुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.