नवी दिल्ली : होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती गॅस कंपन्यांनी दीर्घ कालावधीनंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर 1 मार्चपासून लागू झाले आहेत. 6 जुलै 2022 नंतर तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच किंमती बदलल्या आहेत.
प्रमुख शहरात घरगुती सिलेंडरची किंमत : आता मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1102 रुपये झाली आहे. आतापर्यंत हे सिलेंडर 1052 रुपयांना मिळत होते. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1053 रुपयांऐवजी 1103 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1079 रुपयांऐवजी 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांऐवजी 1118.5 रुपये असेल.
व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही वाढ : या सोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या ग्राहकांना देखील मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आत दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1769 रुपयांऐवजी 2119.5 रुपयांना मिळेल. कोलकात्यात तो 1870 रुपये होता, आता तो 2221.5 रुपये झाला आहे. मुंबईत त्याची किंमत 1721 रुपयांवरून आता 2071.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये 1917 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 2268 रुपयांना मिळणार आहे.