पंचकूला - हरियाणातील पंचकुला येथे एका लहान मुलीच्या पोटात दीड किलो केसांचा गुच्छ ( hair bunch in 6 years Old Girl Stomach ) सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथी डॉक्टरांनी ६ वर्षांच्या मुलीच्या पोटातून जवळपास दीड किलो केसांचा गुच्छ काढला आहे. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक दिवसांपासून होती पोटदुखी -
पंचकुला सेक्टर 6मध्ये असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी 6 वर्षीय मुलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून सुमारे दीड किलो केसांचा गुच्छ काढला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मुलीच्या यशस्वी ऑपरेशनबद्दल मुलीच्या कुटुंबीयांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंचकुलाच्या मदनपूर गावात राहणारी 6 वर्षीय मुलगी अनेक दिवसांपासून पोटदुखीची तक्रार करत होती. असह्य वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी मुलीला पंचकुला सेक्टर 6 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.