महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dnyaneshwari Jayanti 2022 भाद्रपद वद्य षष्ठीला होणार 'ज्ञानेश्वरी जयंती' साजरी - know the facts of Dnyaneshwari

भाद्रपद वद्य षष्ठी, 16 सप्टेंबर दिवशी, वारकरी यंदाची 'ज्ञानेश्वरी जयंती' (Dnyaneshwari Jayanti 2022) साजरी करणार आहेत. वयाच्या 21 व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी (Sant Dnyaneshwar Maharaj) समाधी घेतली असली; तरीही अल्प आयुष्यात त्यांनी केलेले काम आज जगाला प्रेरणा देत आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेचे रूपांतरण मराठीत केले, त्याला 'ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका' म्हणून ओळखले जाते.

Dnyaneshwari Jayanti 2022
ज्ञानेश्वरी जयंती

By

Published : Sep 13, 2022, 7:19 PM IST

माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी (Sant Dnyaneshwar Maharaj), आपल्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद्भगवद्गीता मराठी भाषेमध्ये 'श्रीज्ञानेश्वरी' (Dnyaneshwari Jayanti 2022) नावाने निर्माण केली.

भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी ।। स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी ।। तेंचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ।। एकाजनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्वरी

ऐतिहासिक नोंदींनुसार, संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेवर भाष्य करण्यासाठी, त्यामधील बोध जनसामान्यांपर्यंत पोहचावा म्हणून, रसाळ आणि आपल्या ओघवत्या मराठी भाषेत त्याची निर्मिती केली. तो ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला. नंतर त्याच्या अनेकांनी प्रती लिहल्या. मात्र त्यामध्ये चूका, शब्द, ओळी गाळणे अशा गोष्टी घडायला लागल्या. म्हणून संत एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुद्ध केला. ही प्रक्रिया पूर्ण झाली तो दिवस भाद्रपद वद्य षष्ठी चा होता, अशी नोंद आहे. त्यामुळे पुढे वारकरी बांधव दरवर्षी भाद्रपद वद्य षष्ठीला 'ज्ञानेश्वरी जयंती' साजरी करतात.

ज्ञानेश्वरीची तीन नावे : भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी या ग्रंथाची पर्यायी नावे आहेत. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेले नाही. संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीतादर्शन अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे पुढीलांनी रूढ केली असावीत, असे सांगितले जाते.

पसायदानाने झाली ज्ञानेश्वरीची सांगता : ज्ञानेश्वरीत एकूण 18 अध्याय आहेत. पसायदान हे 18 व्या अध्यायाचा एक भाग आहे. त्याने ज्ञानेश्वरीची सांगता होते. त्यामध्ये जगाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. दरम्यान त्यानिमित्ताने दरवर्षी नेवासे येथील, ज्ञानेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रबोधनपर, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर जयंती साजरी केली जाते. सनातन धर्माची शिकवण आणि उपदेश सामान्यांपर्यंत पोहचवण्यसाठी संत ज्ञानेश्वर यांनी भरीव कामगिरी केली आहे.

पसायदान ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेचेवैशिष्ट्य हे की ती धर्म, पंथ, काल या सर्वांच्या पलीकडे आहे. सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे यात मागणे मागितले आहे.

ज्ञानेश्वरीचा थोडक्यात इतिहास : ज्ञानेश्वरीची एकनाथपूर्वकालीन विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. तिची जुन्यात जुनी प्रत मिळविण्याचे अनेक प्रयत्न झाले. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध भावार्थ आहे. निवृत्तिनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन आहे. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. या ज्ञानेश्वरीला तब्बल ७३० पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली असून, भाद्रपद वद्य षष्टी ही ज्ञानेश्वरीची जयंती मानली जाते. शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, असे म्हटले जाते.

ज्ञानेश्वरीची वैशिष्टये : ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते. ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगितली. तसेच श्रोत्यांशी वेळोवेळी संवादही साधला. त्यांच्या या श्रोतृसंवादाची काही वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येतात.

ज्ञानेश्वरी हा एक श्रोतृसंवाद आहे. ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत, असे आपल्याला वाटते. पण असे असूनही ज्ञानेश्वरी कधी बहिर्मुख होत नाही तिची अंतर्मुखता ती सोडत नाही.

ज्ञानेश्वरीच्या या श्रोतृसंवादाचे एक महत्त्वाचे आणि अनन्य साधारण वैशिष्ट्य म्हणजे, श्रोताहा या निर्मितिप्रक्रियेत सहभागी आहे, याची स्पष्ट जाणीव ज्ञानेश्वरांना होती. यातील संवाद सविस्तर आणि मनापासूनचे आहेत. यातून ज्ञानेश्वरांच्या अलौकिक, आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार झालेला दिसून येतो. आपले विवेचन फुलवताना ज्ञानेश्वर श्रोत्यांच्या प्रगट व संभाव्य प्रतिक्रिया लक्षात घेतात.

ज्ञानेश्वरांच्या श्रोतृसंवादात अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचाच एक भाग होतो, असे अभ्यासक सांगतात. ज्ञानेश्वरांवर नाथसंप्रदाय आणि भागवत संप्रदाय या दोन संप्रदायांचे संस्कार होते. या दोन्ही संप्रदायांतील विचारसरणींचे ऐक्य ज्ञानेश्वरांनी घडवून आणले आणि ज्ञानभक्तीचे एक नवे तत्त्वज्ञान जगाला दिले.

ज्ञानेश्वरी जयंतीचे आयोजन : मराठी भाषेतून विश्वात्मक देवाकडे जगत्कल्याणासाठी पसायदानाचे अमृतदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्येज्ञानेश्वरी वाचन प्रामुख्याने केल्या जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details