कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची सामना पाहायला मिळत आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रचाराचे रान उठवले आहे. आज अमित शाह यांनी बशीरहाट दक्षिणमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाला २०० जागांनी जिंकून द्या आणि दीदींना 'निरोप' द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
दीदी आता गडबडल्या आहेत. रोज माझा राजीनामा मागत आहेत. जेव्हा जनता मला राजीनामा मागेल. तेव्हा तो देईल. मात्र, आता तुमचा राजीनामा जनता मागत आहे. राजीनामा तयार ठेवा येत्या 2 मेला तुम्हाला तो द्यावा लागेल, अशी टीका अमित शाह यांनी केली.
ममता दीदींच्या सुचनेनुसार काही युवकांनी मतदान केंद्रावर हल्ला केला. सीआयएसएफकडून हत्यारे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी सीआयएसएफच्या जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, असे शाह म्हणाले. ही निवडणूक महिला शक्ती आणि तृणमृल यांच्यामध्ये आहे. बंगालचे युवक, व्यापारी, गरीब आणि शेतकरी तृणमूलविरोधात आहेत. दीदींची पाठवणी करण्यासाठी बंगालची जनता तयार आहे, असेही शाह म्हणाले.
दीदी जनतेला त्रास देताय -
सध्या बंगालमध्ये दीदींच्या राज्यात तीन कायदे चालत आहेत. एका आपल्या भाच्यासाठी, दुसरा घुसखोरांसाठी, या दोन्ही कायद्यात शिक्षेचे प्रावधान नाही. तर तिसरा सामान्य नागिरकांसाठी आहे. या तिसऱ्या कायद्यात सर्व शिक्षेचे प्रावधान असून दीदी जनतेला त्रास देत आहेत, असे शाह म्हणाले.