मदुराई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय. लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. मात्र, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीस मिळतय. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू आहे. जमीनीवर लॉकडाऊन असलं म्हणून काय झालं. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका जोडप्याने थेट आकाशात साताजन्माची गाठ बांधली.
अर्थात त्यांनी विमानात लग्न रचलं आहे. सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, त्यांना हे लग्न चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशीचे आदेश दिले आहेत.
लग्न समारंभामध्ये भाग घेतलेल्या आणि कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या सर्व प्रवाशांविरूद्ध डीजीसीएने तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. या घटनेसंदर्भात डीजीसीएने विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून संपूर्ण अहवाल मागविला आहे. तसेच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे कडक निर्देश डीजीसीएने दिले आहेत. दरम्यान, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विमानात लग्न होणार असल्याची माहिती नव्हती, असे मदुराई विमानतळ संचालक एस. सेंथिल वलावन यांनी सांगितले