भोपाळ -शेतात आदिवासी कुटुंबातील पाच जणांचे सांगाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. 8-10 फूट खड्डा खोदून मृतदेह शेतात पुरले होते. मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नेमावारमध्ये ही भंयकर घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच सदस्य गेल्या 48 दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी जेसीबीने खोदून मृतदेह बाहेर काढले आहेत. 13 मे रोजी रात्री नेमावारमधून आदिवासी कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाले होते. यात चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह मंगळवारी सुरेंद्र ठाकूर यांच्या शेतात सापडले. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आदिवासी कुटुंबाचा शोध घेण्याची आदिवासी संघटनांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. अलीकडेच पोलिसांनी बेपत्ता लोकांची माहिती देणाऱयास बक्षीस जाहीर केले होते.