इंदूर (मध्य प्रदेश) Devendra Fadnavis :तेलंगणात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधींनी दिलेल्या सहा गॅरंटी योजनेला भाजपनं खोटं ठरवलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जन आशीर्वाद यात्रेत सहभागी होण्यासाठी इंदूरला पोहोचले होते. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदीनीं ९ वर्षात लोकांचं जीवन बदललंय, जे दिसून येतं.
काँग्रेस फक्त खोटं बोलते : सोमवारी इंदूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फक्त तेलंगणातच नाही तर जिथे-जिथे काँग्रेसनं गॅरंटी दिली, तिथे काँग्रेस एक तरी गॅरंटी पूर्ण करू शकली का? काँग्रेस फक्त खोटं बोलते. निवडणुकीत आश्वासनं देते आणि मतांचं राजकारण करते. पण नंतर काँग्रेसवाले या गोष्टी विसरतात. कारण ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असं फडणवीस म्हणाले.
'इंडिया' आघाडीत सगळेच नेते : उद्धव ठाकरे 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेच्या प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. इंडिया आघाडीत कोणीही एकमेकांना नेते म्हणून स्वीकारायला तयार नाही. आघाडीत जितके पक्ष आहेत, त्यापेक्षा दुप्पट नेत्यांची संख्या आहे. त्यामुळे अशा प्रकारची युती कधीच चालत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, यातील बहुतांश नेत्यांचं दुसऱ्या राज्यात अस्तित्व नाही. ममता दीदी उत्तर प्रदेशात आणि अखिलेश बंगालमध्ये कोणताही चमत्कार करू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.