चंदीगड : बलात्कार आणि हत्येप्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीम शनिवारी कधीही तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. पॅरोल दरम्यान राम रहीम त्याच्या बरनावा येथील आश्रयस्थानात राहणार आहे.
वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी अर्ज : आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला होता. त्याची पॅरोलची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली होती. आता पुन्हा एकदा राम रहीम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येत आहे. या आधी 19 जानेवारीला हरियाणाचे तुरुंगमंत्री चौधरी रणजित सिंह चौटाला यांनी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमने पॅरोलबाबत याचिका दाखल केल्याचे सांगितले होते. गुरमीत राम रहीमने 25 जानेवारी रोजी शाह सतनाम सिंह यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी पॅरोलचा अर्ज केला होता. पॅरोलबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या आधीही राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल आणि 40 दिवसांची फर्लो मिळाली आहे.
अशा प्रकारे मिळाला पॅरोल : डेरा प्रमुख राम रहीमला त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी 24 ऑक्टोबर 2020 रोजी एक दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. तत्पूर्वी, 12 मे 2021 रोजी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पीजीआय रोहतकमध्ये नेण्यात आले होते. 17 मे 2021 रोजी त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी त्याला पुन्हा पॅरोल मंजूर करण्यात आला. 3 जून 2021 रोजी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला पुन्हा पीजीआय रोहतकमध्ये नेण्यात आले आणि 6 जून 2021 रोजी त्याला मेदांता, गुरुग्राम येथे दाखल करण्यात आले. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला 7 फेब्रुवारी 2022 रोजी पहिल्यांदा 21 दिवसांसाठी सुट्टी मिळाली. त्यानंतर 17 जून रोजी 30 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला. नंतर ऑक्टोबर 2022 मध्ये राम रहीमला पुन्हा 40 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला. या 40 दिवसात राम रहीमने अनेक गाणी गायली, व्हिडिओ बनवले आणि सत्संग केला.
दोषी ठरवल्यानंतर हिंसाचार झाला : 25 ऑगस्ट 2017 रोजी बाबा राम रहीमला पंचकूला विशेष न्यायालयाने साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवले होते. 28 ऑगस्ट 2017 रोजी त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. त्याला दोषी ठरवल्यानंतर पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात हरियाणातील पंचकुलामध्ये 32 जणांचा तर सिरसामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच हिंसाचारात कोट्यवधींच्या मालमत्तेचेही नुकसान झाले होते.
हेही वाचा :Bageshwar Dham Sarkar : बागेश्वर धामचे सत्य आले समोर, बाबांनी स्वीकारले आव्हान.. करून दाखवला 'असा' चमत्कार