महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आगामी निवडणूक लढविणार - उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर - गोवा निवडणूक

आगामी विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून, मुख्यमंत्री सावंत हेच भाजपाचा चेहरा असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

By

Published : Jul 25, 2021, 7:17 PM IST

Updated : Jul 25, 2021, 7:33 PM IST

पणजी (गोवा) -गोव्यात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींचे वारे आत्तापासूनच वाहू लागले आहे. त्यात सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष काँग्रेस, गोवा फॉरवर्ड सह गोव्याच्या राजकारणात नवखा असलेला आम आदमी पक्ष अर्थात आपही या निवडणुकीत आपले नशीब आजमावयाचा प्रयत्न करत आहे. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांच्या शिडात निवडणुकीची हवा भरवून गेले. त्यामुळे गोव्यात आप विरुद्ध भाजपा असा राजकीय संघर्ष सुरू झाला. भाजपानेही याला जोरदार प्रत्युत्तर देत आपली सत्ता राखण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कालपासून गोवा दौऱ्यावर आहेत, त्यांनी काल नेत्यांना निवडणूका जिंकण्याचा कानमंत्र दिला. आगामी विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून, मुख्यमंत्री सावंत हेच भाजपाचा चेहरा असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
वर्चस्व टिकविण्यासाठी भाजपातील अंतर्गत गटबाजी उघड

दरम्यान दिल्लीत असलेले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर नाईक यांच्यासोबत राज्याच्या राजकारणात येण्यास उत्सुक आहेत. मधल्या काळात राज्याचे नेतृत्व नाईक यांच्या हातात सोपवावे, अशी मागणीही पडद्याआडून तेंडुलकर यांनी केली होती. याबद्दल आज त्यांना विचारणा केली असता आपण थोड्याच दिवसांत याबाबद्दल योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, असे सांगत पक्षाने संधी दिली तर विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अस्थिरता

मार्च 2019 मध्ये गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यावर भाजपाचे अनेक नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. त्यात राजेंद्र आर्लेकर व खासदार श्रीपाद नाईक यांची नावे आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी पक्षाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या गळ्यात माळ घालून सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाल्याचे पहावयास मिळते.

काँग्रेस व मगोच्या एकूण 12 आमदारांना पायघड्या

मार्च 2019 पूर्वी पर्रीकर मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड हे भाजपाचे घटक पक्ष होते. पर्रीकर मुख्यमंत्री असताना या सर्व घटक पक्षांची मोट बांधण्यात त्यांना यश आले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री सावंत यांना ते शक्य झाले नाही. म्हणून सत्ता बळकटीकरण करण्यासाठी काँग्रेस व मगोच्या 12 आमदारांना पक्षात सामावून घेण्यात सावंत यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. पुढे यातील काही आमदारांना सत्तेत मंत्रीपदे तर काहींना महामंडळे बहाल करण्यात आले होते. साहजिकच यामुळे पक्षातील जुने नेते नाराज असल्याचे खासगीत बोलले जात आहे.

Last Updated : Jul 25, 2021, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details