पाटणाDengue Outbreak In Bihar : बिहारमध्ये डेंग्यू आजारानं थैमान घातलंय. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 333 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षातील एका दिवसातील हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये एकट्या पाटण्यात 91 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता पाटण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 916वर पोहोचलीय.
नागरिक डेंग्यूने त्रस्त :या वर्षी आतापर्यंत डेंग्यूचे 2 हजार 99 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकट्या सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 2 हजार 824 वर पोहचलीय. डेंग्यूचा प्रभाव भागलपूरमध्येही कायम आहे. यासोबतच राज्यातील सिवान, जमुई, औरंगाबाद, सारण, मुंगेर या सर्व जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 53 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत.
विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन : राज्यातील 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात एकूण 274 डेंग्यू रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एकट्या भागलपूर मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलमध्ये 115 रुग्ण दाखल आहेत. पाटण्याच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात एकूण 62 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. PMCH मध्ये 16, IGIMS मध्ये 16, AIIMS मध्ये 20, NMCH मध्ये 10 रुग्ण दाखल आहेत. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी लोकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
डेंग्यू रुग्णांनी भरपूर पाणी प्यावं :आरोग्य विभाग, नगरविकास विभाग संयुक्तपणे डेंग्यूग्रस्त भागात फॉगिंग, अँटी लार्व्हा फवारणीवर विशेष भर देत आहेत. पाटण्यात डेंग्यूचं वाढतं प्रमाण पाहता, ज्येष्ठ डॉक्टर मनोज कुमार सिन्हा यांनी डेंग्यू टाळण्यासाठी घराजवळ कुठेही पाणी साचू देऊ नये, असं आवाहन केलंय. डेंग्यूमध्ये शरीरात पाण्याची कमतरता असते, त्यामुळं शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, इलेक्ट्रोलाइट्सचं सेवन करावं, घराबाहेर पडताना अंग झाकणारे कपडे घालावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा अशा सूचना करण्यात येत आहेत.
रक्तपेढ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात प्लेटलेट्स :यासोबतच डेंग्यूचं वाढते रुग्ण पाहता, सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सचा पुरेसा साठा राखून ठेवण्याचे निर्देशही आरोग्य विभागानं दिले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळं राजधानी पाटणामध्ये राज्य डेंग्यू नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. इथं रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. डेंग्यू नियंत्रण कक्षाचा 0612-2951964 हा हेल्पलाइन क्रमांक आरोग्य विभागानं जारी केला आहे. एका कॉलवर, नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटा, रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सची उपलब्धता याबद्दल माहिती मिळू शकते.
हेही वाचा -
- Treatment of lymphoma : लिम्फोमाच्या उपचाराबरोबरच योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे....
- Kesar Tea Benefits : केशर चहा प्यायल्यानं होतात 'हे' आरोग्य फायदे; पण बनवताना करू नका ही चूक...
- World Lymphoma Awareness Day 2023 : जागतिक लिम्फोमा जागरूकता दिवस 2023; वेळेवर उपचारानं बरा होऊ शकतो लिम्फोमा