जोशीमठातील हॉटेल पाडण्याचे काम सुरु चमोली (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. हॉटेल मलारी आणि माउंट व्ह्यू येथून या कारवाईला सुरुवात झाली आहे. हॉटेल मालक आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत नुकसान भरपाईचा निर्णय झाल्यानंतर हॉटेल पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आधीही सरकारने स्थानिकांना बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलकांना घटनास्थळावरून हटवून इमारती तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जोशीमठातील जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरु 700 हून अधिक धोकादायक घरे ओळखली : यावेळी हॉटेल मलारीचे मालक ठाकूर सिंह राणा म्हणाले की, 'शेजारील हॉटेलच्या इमारतीचा इतका दबाव आहे की माझे हॉटेल आता कोसळणार आहे. मी असहाय्य आहे. काही बोलू शकत नाही. एखाद्याचे हॉटेल पाडले जात असेल तर कोणाला आनंद होईल का?' ही दोन्ही हॉटेल दरडांमुळे मागे झुकली आहेत. तांत्रिक समितीने नुकताच तपास करून अहवाल दिला होता. यामध्ये जीर्ण बांधकामे तातडीने पाडण्याची शिफारस शासनाला करण्यात आली. या जीर्ण वास्तूंमुळे जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला होता. जोशीमठमधील दरड सतत लोकांना घाबरवत आहे. आतापर्यंत 700 हून अधिक धोकादायक घरे प्रशासनाने ओळखली आहेत.
हेही वाचा :Joshimath : जोशीमठ आपत्तीग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटला, भाजप प्रदेशाध्यक्षांना घेराव
मुख्यमंत्र्यांचा जोशीमठमध्येच तळ : दुसरीकडे लोकांचा रोष पाहून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही जोशीमठमध्येच तळ ठोकला आहे. 11 जानेवारीला सकाळी मुख्यमंत्री धामी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बाधितांना देण्यात येणाऱ्या अंतरिम मदतीत पूर्ण दक्षता घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय त्यांनी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या एजन्सींना सांगितले की प्रथम प्राधान्य लोकांच्या सुरक्षेला आहे. त्यामुळे ज्या घरांना भेगा पडल्या आहेत त्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आधी सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे. प्रशासकीय अहवालाच्या आधारे आतापर्यंत सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षां विरोधात घोषणाबाजी : उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र प्रसाद भट्ट बाधित भागाची पाहणी करण्यासाठी 9 जानेवारीला जोशीमठ येथे पोहोचले होते. तेव्हा लोकांनी त्यांना घेराव घातला आणि संताप व्यक्त केला. महेंद्र भट्ट लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण स्थानिक लोकं त्यांचे काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त लोकांनी महेंद्र भट्ट यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी महेंद्र भट्ट यांना कसेबसे गर्दीपासून दूर नेले.
हेही वाचा :Joshimath : ऐतिहासिक जोशीमठ शहर भूस्खलनामुळे धोक्यात