लखनौ Illegal Weapons :नुकतेच यूपी एसटीएफने उत्तर प्रदेशच्या राजधानीतील उच्च सुरक्षा क्षेत्र हजरतगंज येथून तस्करांकडून सहा हाय-टेक बेकायदेशीर पिस्तुल जप्त केली आहेत. या कारवाईनंतर यूपीमध्ये अवैध शस्त्रांची मागणी आणि पुरवठा किती वाढला आहे हे स्पष्ट दिसतंय. मागील तीन वर्षांमध्ये यूपी पोलिसांनी राज्यातील गुन्हेगारांकडून तब्बल 1 लाख 1400 हून अधिक अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. तर बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या शेजारील राज्यांमध्ये या तीन वर्षांत 65 हजार अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळं अवैध शस्त्रांच्या बाबतीत यूपीने मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानलाही मागे टाकलं आहे.
90 च्या दशकापासून यूपी, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेशात माफिया राजचे वर्चस्व आहे. अवैध शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री असो किंवा त्यांचा अनधिकृत वापर असो, ही चार राज्ये नेहमीच चर्चेत असतात. माफिया राज संपलं असलं तरी आजही इथं शस्त्रास्त्रांची मागणी आणि पुरवठा अव्याहतपणे सुरू आहे. यूपी पोलीस आणि एनसीआरबीचे आकडेही याची साक्ष देत आहेत. यूपीमध्ये जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची संख्या ही बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे.
आकडेवारीवर एक नजर :
- 2020 ला यूपीमध्ये एकूण 36,680 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. यामध्ये देशद्रोही घटकांकडून 3904 आणि इतर गुन्हेगारांकडून 32,776 शस्त्रे जप्त करण्यात आली, तर याच वर्षात मध्य प्रदेशात 11,119, बिहारमध्ये 3738 आणि राजस्थानमध्ये 5447 शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
- 2021 ला यूपीमध्ये पोलिसांनी एकूण 37,574 शस्त्रे जप्त केली होती. यामध्ये देशद्रोही घटकांकडून 3396 तर इतर गुन्हेगारांकडून 33,178 शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्याचवेळी, मध्य प्रदेशात एकूण 12,881, बिहारमध्ये 4035 आणि राजस्थानमध्ये 6786 जप्त करण्यात आले आहेत.
- 2022 ला यूपीमध्ये एकूण 38,473 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. यामध्ये देशद्रोही घटकांकडून 2986 आणि इतर गुन्हेगारांकडून 35,487 शस्त्रे जप्त करण्यात आली होती. तर मध्य प्रदेशात 13,156, बिहारमध्ये 4188 आणि राजस्थानमध्ये 6285 शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत यूपीमध्ये 41,532 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.