नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग करून दिल्ली एम्सजवळ कारमधून त्यांना १० ते १५ मीटरपर्यंत ओढून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मालीवाल त्यांच्या टीमसोबत फूटपाथवर उभ्या असताना हा प्रकार झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. बुधवारी रात्री उशिरा एम्सजवळ एक घटना घडली. आरोपीने स्वाती यांचा विनयभंग केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ट्विट करून दिली माहिती:रात्री उशिरा महिलांच्या सुरक्षेची तपासणी करत असताना ही घटना घडल्याचे मालीवाल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'काल रात्री मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला आणि जेव्हा मी त्याला पकडले तेव्हा त्याने माझा हात गाडीच्या काचेत बंद करून मला ओढले. देवाने जीव वाचवला. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील, तर परिस्थितीची कल्पना करा', असेही त्यात म्हटले आहे.
कारमध्ये बसण्याची ऑफर:दिल्ली पोलिसांना आज पहाटे 3:11 वाजता पीसीआर कॉलद्वारे माहिती मिळाली की, बलेनो कारने एम्स बस स्टॉपच्या मागे एका स्वाती यांच्याकडे पाहून चुकीचे हावभाव केले, आणि तिला गाडीतून ओढले, असे दक्षिण दिल्ली जिल्हा पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची गरूंडा व्हॅन घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी स्वाती यांच्याशी घटनेसंदर्भात चर्चा केली.