नवी दिल्ली Schools closed due to cold :राजधानीत सध्या प्रचंड थंडी आहे, त्यामुळं दिल्लीतील पाचवी पर्यंतच्या शाळा पुढील पाच दिवस बंद राहणार आहेत. दिल्ली सरकारमधील शिक्षणमंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिलीय.
आदेश मागे घेण्यात आला : तत्पूर्वी शनिवारी (6 जानेवारी) दिल्लीतील थंडीची लाट आणि धुक्याची स्थिती पाहता शिक्षण मंत्रालयानं 10 जानेवारीपर्यंत सरकारी आणि निमसरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र तासाभरानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. काही अनियमिततेमुळं हा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. तसंच यासंदर्भातील पुढील आदेश रविवारी काढण्यात येणार आहेत.
नव्या आदेशात काय म्हंटलंय : दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार दिल्लीतील नर्सरी पासून पाचवी पर्यंतच्या शाळा पुढील पाच दिवस बंद राहणार आहेत. याचाच अर्थ सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत.
हवामान खात्याने केला यलो अलर्ट जारी : दरम्यान, मागील काही दिवसांपासून दिल्लीत थंडीची लाट आणि धुके पाहायला मिळत आहे. याबाबत हवामान खात्याने यलो अलर्टही जारी केला आहे. रविवारी (7 जानेवारी) सकाळी दिल्लीचे तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय 9 जानेवारी रोजी दिल्लीत हलक्या रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या हवामान अंदाजामुळं पाचवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.