दिल्ली : राजधानीतील तिहार कारागृहात पुन्हा एकदा गँगवार उफाळले असून या गँगवारमध्ये कुख्यात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाचा खात्मा करण्यात आला. टिल्लू ताजपुरियाने वकिलाच्या वेशात दिल्लीतील रोहिणी न्यायालयात गोळीबार करुन दोन कुख्यात गँगस्टरचा बळी घेतला होता. टिल्लूवर योगेश टुंडा आणि त्याच्या साथिदारांनी मंगळवारी सकाळी हल्ला केला. हल्ल्यानंतर टिल्लूला तात्काळ दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.
मंगळवारी सकाळी झाला हल्ला :दिल्लीच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अक्षत कौशल यांनी पोलिसांना मंगळवारी सकाळी ७ वाजता दीनदयाल उपाध्याय रुग्णालयातून या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. यात तिहार कारागृहातून रुग्णालयात आणलेल्या दोन अंडरट्रायल कैद्यांवर हल्ला झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे कौशल यांनी स्पष्ट केले. त्यापैकी एकाला बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले होते, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. सुनील उर्फ टिलू असे त्याचे नाव आहे. त्याचा साथिदार रोहितला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती उपायुक्त कौशल यांनी दिली.
रोहिणी न्यायालयात टिल्लूने केला होता गोळीबार :रोहिणी न्यायालयात कुख्यात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाने गोळीबार केला होता. त्यामुळे या गोळीबार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून टिल्लू ताजपुरियाचे नाव होते. 2021 मध्ये वायव्य दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या 207 क्रमांकाच्या खोलीत झालेल्या गोळीबारात गँगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगी आणि इतर दोन जण ठार झाले होते.