महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण; दंगल पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत

By

Published : Feb 24, 2021, 5:26 PM IST

एक वर्षापूर्वी म्हणजेच 24 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत दंगल उसळली होती. या दंगलीत 53 जणांनी जीव गमावला तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. भयान हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप दंगल पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

दिल्ली हिंसाचार
दिल्ली हिंसाचार

नवी दिल्ली -दिल्लीत घडलेल्या भयान हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप दंगल पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. हिंसाचाराप्रकरणी पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहचला आहे, याबाबत अनभिज्ञ असल्याचे दंगलीत मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी सांगितले. तर आतापर्यंत दिल्ली दंगल प्रकरणात 750 गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दंगलीत दिलबर नेगी नामक व्यक्तीचा मृतदेह शिव विहारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला होता. जमावाने दिलबरची दूध डेअरी उद्धवस्त केली होती. दिलबर नेगी हा घरातील कमावता होता. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट असल्याचे उत्तराखंडमधील रहिवासी देवैंद्र नेगी यांनी सांगितले. देवैंद्र नेगी हा दिलबर नेगीचा नातेवाईक आहे. दिल्लीच्या गुन्हे शाखेने दिलबर नेगीच्या मृत्यूप्रकरणी मला एकदा कॉल केला होता आणि दिल्लीत बोलावले होते. मात्र, आर्थिक कारणांमुळे दिल्लीत जाऊ शकलो नाही. मात्र, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, असे देवैंद्र नेगी यांनी सांगितले. गेल्या एका वर्षात काहीच कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडून मदत नाही -

दिल्ली दंगलीत जमावाने शैक्षणिक संस्थांना पेटवून दिले होते. यात डीआरपी कॉन्व्हेंट शाळा जळून खाक झाली होती. डीआरपी कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापक पंकज शर्मा यांचे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, त्यांना सरकारकडून दहा लाख रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिल्ली सरकारने पीडितांच्या नातेवाईकांना फारशी आर्थिक मदत केली नसल्याचा दावा पंकज यांनी केला. दंगलीच्या एका वर्षानंतरही पीडित कुटुंब सरकारच्या मदतीची वाट पाहत आहेत.

दिल्ली दंगल -

एक वर्षापूर्वी म्हणजेच 24 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत दंगल उसळली होती. या दंगलीत 53 जणांनी जीव गमावला तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी विरोधात दिल्लीत धरणे आंदोलन सुरू होते. याला काही कट्टरतावाद्यांचा विरोध होता. या आंदोलनात आघाडीवर मुस्लिम समुदाय होता. शाहीन बाग हे आंदोलनाचे केंद्र बनले होते. एकमेकांविरोधातील राग, द्वेष, कट्टरतावाद वाढत गेला. देश के गद्दारोंको, गोली मारो, असे नारे दिले गेले. याचे पर्यावसन दंगलीत झाले. दगडफेक, जाळपोळ, गोळीबार, मारहाण झाली. ईशान्य दिल्लीतून धुराचे लोट निघाले. या दंगलीत निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details