नवी दिल्ली :भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, महिलांना अजूनही लैंगिक छळाचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, राहुल गांधी यांना पीडित महिलांबद्दल तपशील देण्यास सांगितले आहे. जेणेकरून या प्रकरणी कारवाई केली जाऊ शकते आणि त्या महिलांना सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते.
पीडित महिलांची माहिती मागवली : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट पाहता पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी राहुल गांधी यांना एक प्रश्नावलीही पाठवली असून त्यात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची तपशीलवार माहिती मागवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान हे कथित वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी ऐकले आहे की देशात अजूनही महिलांचा लैंगिक छळ होत आहे.