नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, यावेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या. या हिंसाचारास पोलिसांनी शेतकरी आंदोलनकर्त्यांसोबत नेत्यांनाही जबाबदार धरले आहे. सुमारे ४० नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या नेत्यांविरोधात 'लुक आऊट' नोटीसही जारी करण्यात आली आहे.
या हिंसाचारास शेतकरी नेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. स्वराज इंडिया संघटनेचे अध्यक्ष योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, भारतीय किसान युनियन हरयाणा विभागाचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांच्यासह सुमारे ४० नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
आंदोलकांवर कठोर कारवाई होणार -
हिंसाचारात सहभाग घेणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे. ट्रॅक्टर रॅलीत नियमभंग केल्यामुळे कारवाई का करू नये, अशी नोटीसही शेतकरी नेत्यांना पाठविण्यात आली आहे. तसेच या नेत्यांचे पासपोर्ट ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.