नवी दिल्ली :केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करणार आहेत. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या या 'किसान परेड'साठी दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांना एक रोडमॅप दिला आहे. यामध्ये दिलेल्या ठराविक मार्गांवरुनच ही परेड नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शेतकरी सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने रवाना होतील. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना सुचवलेल्या मार्गांमध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या भागातील मार्गांचाही समावेश आहे.
दिल्ली पोलिसांची 'किसान परेड'ला परवानगी; सुचवले तीन मार्ग.. दिल्लीच्या तीन सीमांवर आहेत शेतकरी..
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या तीन सीमांवर आंदोलक शेतकरी उपस्थित आहेत. सिंघू सीमा, टिकरी सीमा आणि गाझीपूर सीमा या तीन सीमांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहेत. प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेल्या किसान परेडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांसोबत चर्चा केली होती. यामध्ये परेडसाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
हे तीन मार्ग करण्यात आले निश्चित..
- सिंघू सीमेवरुन सुरू झालेली परेड संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर, कंझावला, बवाना, औचंदी सीमा या मार्गाने पुढे जात हरियाणामध्ये प्रवेश करेल.
- टिकरी सीमेवरुन सुरू झालेली परेड नांगलोई, नजफगढ आणि ढांसामार्गे पुढे जात केएमपीकडे रवाना होईल.
- गाझीपूर सीमेवरुन निघालेली परेड यूपी गेट, अप्सरा सीमा यामार्गे जात पुढे हापुड मार्गावर जाईल.
हेही वाचा :सिंघू सीमेवर ५० हजारांहून अधिक शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीत..