नवी दिल्ली - केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. यावेळी काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर हिंसाचार केला होता. याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचार करण्याचा कट नोव्हेंबरमध्ये रचण्यात आला होता. नोव्हेंबरपासूनच लाल किल्ल्यावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू होती. सरकारची बदनामी व्हावी, या हेतूने हिंसाचारासाठी प्रजासत्ताक दिन निवडण्यात आला. दिल्ली गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हा खुलासा झाला आहे.
दिल्ली पोलिसांनी नुकतेचं लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबद्दल आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. नोव्हेंबर 2020 पासूनच लाल किल्ल्यावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू होती. यासाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी करण्यात आले. लाल किल्ला ताब्यात घ्यायचा होता. जेणेकरून सीमेवर नाही. तर लाल किल्ल्यावर बसून आंदोलन करता येईल. परंतु तेथे ज्या प्रकारे हिंसाचार झाला आणि किल्ल्यावर निशान साहिब ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर ते घाबरून पळून गेले, असे आरोपपत्रात दिल्ली गुन्हे शाखेने म्हटलं आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेने न्यायालयात तीन हजाराहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. अटक केलेल्या अनेक आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. या हिंसाचारात 500 हून अधिक पोलीस जखमी झाले. त्याच वेळी, दीडशेहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली. काही शेतकरी नेते फरार आहेत, ज्यांचा शोध सुरु आहे.