महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाचा ७० वा दिवस, सीमांवरील नाकाबंदीचे पोलिसांकडून समर्थन - दिल्ली सीमावर नाकाबंदी बातमी

सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठय़ा खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी नाकाबंदीचे समर्थन केले आहे.

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

By

Published : Feb 3, 2021, 7:15 AM IST

Updated : Feb 3, 2021, 9:09 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा ७० वा दिवस आहे. दरम्यान, विरोधकांनी संसदेत गदारोळ घातल्याचे पडसाद सीमेवरही दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनीही आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्व सीमा बंद केल्या आहेत. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी या नाकाबंदीचे समर्थन केले आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू असून विरोधकांकडून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अशी मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. त्यामुळे मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांनीही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा जोर वाढवला आहे.

शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीत येऊ नये म्हणून खबरदारी -

शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीत घुसू नये यासाठी सीमांवरील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले. एकापेक्षा जास्त बॅरिकेड्सचे अडथळे, काटेरी कुपंण, सीमेंटमध्ये रोवलेले लोखंडी गजाचे तुकडे आणि खिळ्यांचा वापर करून सीमा सील करण्यात आल्या आहेत.

संजय राऊत यांचा दिल्ली दौरा -

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझीपूर सीमेचा दौरा करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या दौऱ्याआधीच पोलिसांनी सगळी नाकाबंदी करून ठेवली होती. भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट राऊत यांनी घेतली. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. त्यांच्याच सूचनेवरून मी गाजीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Last Updated : Feb 3, 2021, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details