हल्दवानी (उत्तराखंड): दिल्ली पोलिसांनी गँगस्टर छोटा राजनचा हस्तक गुंड भूपेंद्र उर्फ भूप्पी याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. भूपेंद्र उर्फ भूप्पी हा उत्तराखंडच्या हल्दवानी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी मंगळवारीच माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 2020 च्या बनावट नोटांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी भूप्पीला न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
बनावट नोटांचा होता व्यवसाय:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूप्पी हा दहशतवादी नौशादसोबत बनावट नोटांच्या व्यवसायात होता. भुप्पी 2020 पासून फरार होता. नौशाद आणि त्याचा एक साथीदार जगजीत सिंग उर्फ जग्गा याला दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात जहांगीरपुरी येथून अटक केली होती. नौशाद आणि जगजीत सिंग हरकत-उल अन्सार संघटना आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. भूप्पी हा गँगस्टर छोटा राजनचा गुंड असल्याचे सांगण्यात येत आहे. छोटा राजनचे थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन होते.
दहशतवादी नौशादने चौकशीदरम्यान दिल्ली पोलिसांना सांगितले की, पाकिस्तानातील त्याच्या हँडलरच्या सूचनेनुसार त्याने दोनदा नेपाळमार्गे पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दोन्ही वेळा तो यशस्वी होऊ शकला नाही, असा दावा एएनआयच्या सूत्रांनी केला आहे. पोलिसांना नंतर लक्षात आले की, दोघे (नौशाद आणि जगजीत सिंग) सुनील राठी, नीरज बवाना, इरफान चेनू, हाशिम बाबा, इबाल हसन आणि इम्रान पहेलवान यांसारख्या काही गुंडांच्या संपर्कात होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना उजव्या विचारसरणीच्या हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचे काम देण्यात आले होते.