नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धू आणि इतर तीन जणांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोबतच हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींवर ५० हजारांचे बक्षीस ठेवले आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
१२ संशयितांची छायाचित्रे जाहीर -
प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीत हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता हिंसाचारात सहभागी असणाऱ्या १२ संशयित आरोपींची छायाचित्रे जाहीर केली आहेत. संशयितांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून १०० जणांना चौकशीची नोटीस धाडण्यात आली आहे.