नवी दिल्ली Delhi Murder Case : केवळ साडेतीनशे रुपयासाठी एका 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलानं तरुणाला तब्बल 50 वेळा भोसकलं. ही धक्कादायक घटना दिल्लीतील ईशान्य परिसरात मंगळवारी रात्री घडली. या मुलानं तरुणाच्या शरीरावर तब्बल 50 वेळा भोसकून त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या डोक्याला लाथ मारत त्याला गल्लीत ओढून त्याच्या मृतदेहापुढं मारेकरी बालक बीभत्स नाचल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं आहे.
मंगळवारी रात्री 11.15 च्या सुमारास स्वागत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता मजदूर कॉलनी गली क्रमांक 18 ईदगाह रोड इथं एका मुलाची चाकूनं हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यावेळी पोलिसांनी रक्तबंबाळ मुलाला रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. - डॉ जावई तिर्की, पोलीस उपायुक्त
तरुणाला तब्बल 50 वेळा भोसकलं : ईशान्य दिल्लीतील परिसरात मंगळवारी रात्री 10.20 च्या सुमारास 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलानं तरुणाला लुटीच्या उद्देशानं अडवलं होतं. दारूच्या नशेत असलेल्या या बालकानं तरुणावर चाकुचे वार केले. यावेळी मुलानं तब्बल 50 वार तरुणावर केले. त्यामुळे पोलीसही हादरुन गेले आहेत. तरुणावर वार करुन हा मुलगा थांबला नाही, तर त्यानं डोक्यात लाथ मारुन मृतदेह अरुंद गल्लीत ओढल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं.