नवी दिल्ली :दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज चौथ्यांदा बैठक होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत तीन बैठका बोलाविण्यात आल्या, मात्र प्रत्येक वेळी गदारोळामुळे महापौरांची निवड होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि दिल्ली सरकारच्या प्रस्तावावर नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर बुधवारी सकाळी 11 वाजता दिल्ली महानगरपालिकेची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक होणार आहे.
निवडणुकाची निकाल काय? : दिल्ली महानगरपालिकेच्या एकत्रिकरणानंतर, महानगरपालिकेची निवडणूक 4 डिसेंबर रोजी झाली आणि त्याचे निकाल 7 डिसेंबर रोजी आले. निवडणुकीत आम आदमी पक्षाने 134 जागा जिंकून बहुमत मिळवले. त्याचवेळी 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या खात्यात 104 जागा आल्या. या शिवाय काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले, तर अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला.
6 जानेवारीला पहिली बैठक : यानंतर एमसीडीची पहिली बैठक 6 जानेवारीला बोलावण्यात आली होती. या बैठकीत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 6 सदस्यांच्या निवडीसोबतच नामनिर्देशित आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या शपथविधीही होणार होत्या. बैठक सुरू असताना उपराज्यपालांनी नियुक्त केलेल्या पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी प्रथम नामनिर्देशित नगरसेवकांना शपथविधीसाठी बोलावले, त्यावरून आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि सभेत गदारोळ सुरू झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली आणि एकमेकांवर हाणामारीचे आरोपही झाले. यानंतर पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी महापालिकेचे कामकाज तहकूब केले.