नवी दिल्ली Delhi Liquor Scam: आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी केली जाण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी वर्तवली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं पाठवलेल्या तिसऱ्या समन्सवरही बुधवारी अरविंद केजरीवाल चौकशीसाठी गेले नाहीत. त्यामुळं बुधवारी उशीरा आम आदमी पक्षाचे खासदार संदीप पाठक, आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी यांनी ही शक्यता वर्तवली आहे.
मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्सवर व्यक्त केली शंका :अरविंद केजरीवाल हे ईडी चौकशीला गेले नसल्यानं ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्सवर याबाबतची शक्यता व्यक्त केली आहे. ईडीनं बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवलं होतं. मात्र त्यानंतरही ते चौकशीला गैरहजर राहिले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा गैरहजर :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या तिसऱ्या समन्सच्यावेळीही चौकशीसाठी गैरहजर राहणं पसंद केलं. अरविंद केजरीवाल यांनी या समन्सला उत्तर दिलं. यात त्यांनी "माझ्यावर केलेल्या आरोपाबाबात मी आक्षेप घेतले आहेत. मात्र त्या आक्षेपाला ईडीकडून काहीच प्रतिसाद न दिल्यानं मला आश्चर्य वाटते. माझ्या आक्षेपाबाबत उत्तर दिलं नाही, उलट तिसरा समन्स पाठवला. या समन्सचं तुमच्याकडं काहीही ठोस कारण नसल्याचा माझा ठाम विश्वास आहे. ईडीचं वर्तन मनमानी आहे" असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.