नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता सोमवारी ईडीसमोर हजर झाल्या. यावेळी ईडीने त्यांची जवळपास 10 तास चौकशी केली. कविता सकाळी 10.30 वाजता मध्य दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचल्या. त्यांची चौकशी आणि जबानी नोंदवण्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली, जी रात्री 9 वाजेपर्यंत चालली. आता ईडीने 21 मार्च रोजी के. कविता यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.
11 मार्चला आठ तास चौकशी झाली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि विधान परिषदेच्या सदस्या कविता (44) ह्यांची या प्रकरणी 11 मार्च रोजी सुमारे आठ तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना 16 मार्च रोजी पुन्हा समन्स बजावण्यात आला होता. परंतु या प्रकरणातील ईडीच्या कारवाईविरूद्ध दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका प्रलंबित असल्याने त्या हजर झाल्या नव्हत्या. त्यानंतर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यांचे दावे फेटाळले होते आणि त्यांना 20 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर 24 मार्च रोजी सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.
व्यापारी अरुण पिल्लई यांना अटक : 11 मार्च रोजी कविता यांची हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांच्या वक्तव्याबाबत चौकशी करण्यात आली होती. कविता यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पिल्लई यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही जणांनाही अटक करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
'माझ्याविरोधात ईडीचा गैरवापर' :या प्रकरणी कविता यांनी म्हटले आहे की, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही. त्यांनी आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार त्यांच्याविरोधात ईडीचा वापर करत आहे. पिल्लई हे दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात सहभागी असलेल्या 'दक्षिण ग्रुप' या मद्य रॅकेटचे कथित नेते होते. पिल्लई हे के. कविता यांच्या जवळचे असल्याचा दावा ईडीने केला आहे. आता रद्द केलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 अंतर्गत राष्ट्रीय राजधानीच्या मद्य बाजाराचा मोठा भाग ताब्यात घेण्याच्या बदल्यात या टोळीने सत्ताधारी आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांच्यासह 12 जणांना अटक केली आहे.
हेही वाचा :BBC Documentary Controversy : बीबीसी डॉक्युमेंटरी दाखविल्याने दिल्ली विद्यापीठाकडून एनएसयूआयच्या विद्यार्थी नेत्याचे निलंबन