नवी दिल्ली :दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाचा (साकेत न्यायालय) 2019 च्या जामिया हिंसाचार प्रकरणात शरजील इमाम, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा यांच्यासह 11 आरोपींना दोषमुक्त करण्याचा निर्णय रद्द केला. तसेच आरोपींवर आयपीसीच्या विविध कलमान्वये आरोप निश्चित केले.
11 आरोपींना दोषमुक्त करण्याचा निर्णय रद्द :दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयाच्या सर्व 11 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला 4 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी यावर निर्णय देताना सांगितले की, शांततापूर्ण संमेलनाचा अधिकार वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे आणि हिंसाचार किंवा हिंसक भाषणाला संरक्षण दिले जात नाही. शांततापूर्ण संमेलनातही हिंसक भाषण देणे योग्य नाही. काही आरोपींचा संदर्भ देत कोर्टाने सांगितले की, प्रथमदर्शनी, व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, आरोपी गर्दीच्या पहिल्या रांगेत होते. ते दिल्ली पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देत होते आणि बॅरिकेड्स हिंसकपणे ढकलत होते.