नवी दिल्ली : शहरातील ३३ खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के आयसीयू बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. याबाबत दिल्ली सरकारने आधीच निर्णय घेतला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती आणली होती. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाच्याच खंडपीठाने ही स्थगिती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती हीमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. याबाबत पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती हटवण्यास नकार..
दिल्ली सरकारने शहरातील खासगी रुग्णालयांमधील आयसीयू खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती दिली होती. याविरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी करत, ही स्थगिती हटवण्यास नकार दिला होता. तसेच, दिल्ली सरकारला पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. तसेच, उच्च न्यायालयाला याप्रकरणी १२ नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले होते.