नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आलीय.दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागात तैनात उपसंचालक आणि त्यांच्या पत्नीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर आपल्याच मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिने बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्याला निलंबित केले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय.
काय आहे प्रकरण :या अधिकाऱ्यावर मित्राच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीचे वडील दिल्लीच्या एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. 1 ऑक्टोबर 2020 रोजी वडिलांच्या मृत्यूनंतर ही मुलगी अस्वस्थ झाली होती. त्यामुळे हे अधिकारी तिला आपल्या घरी घेऊन आले. आरोपांनुसार, त्यांनी नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान या मुलीवर अनेकदा बलात्कार केला. पीडितेने या प्रसंगाची माहिती आरोपीच्या पत्नीलाही दिली होती. मात्र तिने मुलीला गप्प राहण्याचा सल्ला दिला.
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल : पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, 16 जानेवारीला ती तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला भेटायला गेली होती. तेव्हा ती आईसोबत घरी परतली. यानंतर आरोपी सतत पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार आणि इतर कलमांखाली पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली : या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सोमवारी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. 'दिल्लीतील महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक पदावर बसलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यावर एका मुलीच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या पाहिजेत. ज्याचे काम मुलींच्या रक्षणाचे आहे, तोच शिकारी बनला तर मुली कुठे जातील?', असे ट्विट मालीवाल यांनी केलंय.
हेही वाचा :
- Pune Crime : अल्पवयीन तरुणासोबत महिलेचे जबरदस्तीने शरीर संबंध; गुन्हा दाखल
- Nagpur Girl Rape Case : औषध लावण्याच्या बहाण्याने युवतीवर 63 वर्षीय नराधमाचा अत्याचार; 'असं' फुटलं बिंग
- Crime News : महिला कॉन्स्टेबलचा अंघोळ करताना बनवला व्हिडिओ, पुरुष कॉन्स्टेबल निलंबित