नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली बुडण्याचा धोका लवकर टळण्याची शक्यता आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जुन्या रेल्वे पुलावर रात्री 11 वाजता पाण्याची पातळी 205.50 मीटर इतकी खाली झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पाण्याची पातळी अजूनही 205.33 मीटरच्या धोक्याच्या चिन्हाच्या वर असली तरी ती लवकरच खाली येण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यमुना नदीने 45 वर्षानंतर पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली होती. दिल्लीचे महसूल मंत्री आतिशी यांनीही पाणी पातळीची माहिती दिली आहे.
"यमुनेची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे आणि आम्हाला आशा आहे की आज रात्रीपर्यंत यमुनेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या खाली जाईल. आता आपले जीवन पूर्वपदावर आणणे आणि ज्यांना त्यांची जागा रिकामी करावी लागली त्यांच्यासाठी मदत आणि पुनर्वसन शिबिरे उभारणे हे आमचे प्राधान्य आहे. दरम्यान शहराच्या विविध भागात पाणी तुंबले आहे. साचलेले पाण्याचा उपसा आम्ही करत आहोत. - महसूल मंत्री आतिशी
पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी पूर भागाची रविवारी पाहणी केली. दिल्लीतील राजघाट, शांतीवन, लाल किल्ला या भागाची पाहणी मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपराज्यपाल यांनी केली होती. यमुना नदीने 10 जुलैला 205.33 मीटरवर असलेली धोक्याची पातळी ओलांडली होती. केंद्रीय जल आयोगाच्या अंदाजानुसार, 16 जुलै रोजी संध्याकाळी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. शहरातील जुने रेल्वे पुलावरील पाणी पातळी 205.47 वर आली आहे. रात्री 8 वाजे पासून ते 10 वाजेपर्यंत पाण्याची पातळी अजून खाली होण्याची शक्यता आहे.
नदीतून पाण्याचा विसर्ग कमी :हथनी कुंड बॅरेजमधून 11 जुलै रोजी दर तासाला सुमारे 3 लाख 60 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आता हा विसर्ग रविवारी रात्री 8 वाजता 53 हजार 955 क्युसेकवर आणण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) दिल्लीतील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बचाव कार्यासाठी 17 पथके तैनात केली आहेत. NDRF च्या पथकांनी 7 हजार 241 लोक आणि 956 जनावरांना बाहेर काढले आहे. याशिवाय सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या व्यक्तीपैकी 908 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील सहा जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. या भागातून सुमारे 26 हजार 401 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे 21 हजार 504 जणांना 44 छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा -
- Delhi Flood : यमुना नदीच्या पाणी पातळीने तोडले सगळे रेकॉर्ड; झाडावर २२ तास अडकलेल्या तरुणाची थरारक सुटका
- Delhi Flood Alert : यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पाणी पातळी रेकॉर्ड ब्रेक करणार, नागरिकांच्या जीवाचे मात्र हाल