पश्चिम बंगाल - 23 चहा उद्योगातील कामगार संघटनांचे एक मंच असलेल्या जॉइंट फोरमने आज केंद्राच्या नवीन शेतकरी कायद्याविरोधात सिलीगुडी येथे निषेध नोंदविला. गरज भासल्यास आम्ही राज्यातील चहा कामगारांसाठी येत्या काही दिवसांत 'दिल्ली चलो' आंदोलन करू, असे संयुक्त मंचचे नेते आलोक चक्रवर्ती यांनी सांगितले.
दिल्ली शेतकरी आंदोलन : सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार - शेतकरी आंदोलन
22:33 December 01
पश्चिम बंगालमधील चहा उत्पादक शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा
22:16 December 01
मध्य प्रदेश : ग्वाल्हेर ग्रामीण भागातील शेतकरी उद्या दिल्लीत पोहचणार
मध्य प्रदेश - ग्वाल्हेर ग्रामीण भागातील शेतकरी उद्या या आंदोलनात सामील होण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत. शेतकरी संघटनांनी उद्या दिल्लीला रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याबरोबर सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू सोबत बाळगाव्यात, असे आवाहन एका शेतकरी नेत्याने केले आहे.
21:57 December 01
इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस जर्मनीकडून शेतकरी आंदोलनाला कोटी रुपयांची देणगी
दिल्ली- इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस जर्मनीने शेतकरी आंदोलनाला कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वैद्यकीय सेवा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, मृत शेतकर्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी या मदतीद्वारे हात पुढे केला असल्याचे म्हटले आहे.
21:50 December 01
पुढील बैठकीपर्यंत सर्वांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारला विचार मंथन करण्याची वेळ - नरेश टिकैट
दिल्ली- आम्ही उद्या शेती कायद्याशी संबंधित आमच्या समस्यांचा मसुदा सादर करू. सरकारने पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्लीतील शेतकऱ्यांशी संभाषण सुरू केले आहे. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील बैठकीपर्यंत सर्वांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारला विचार मंथन करण्याची वेळ देण्यात आली आहे, असे नरेश टिकैट, बीकेयू अध्यक्ष यांनी सांगितले.
21:34 December 01
शेतकरी नेत्यांनी कायद्यातील आक्षेपार्ह बाबी सरकारच्या लक्षात आणून द्याव्यात - कृषिमंत्री
दिल्ली- नवीन शेतकरी कायद्यातील आक्षेपार्ह बाबींची शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी नोंद घेऊन 2 डिसेंबर रोजी शासनाकडे त्या सादर कराव्यात, अशी सूचना कृषी मंत्रालयाने केली आहे. दुसरी बैठक संपल्यानंतर कृषिमंत्र्यांनी माध्यमांना अशी माहिती दिली.
टिकैत युनियनशी चर्चा खूप चांगल्या वातावरणात झाली, कायदा व इतर शेतीविषयक समस्यांबाबत आम्ही टिकैत किसान युनियनच्या नेत्यांशी चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले आहे की, त्यांनी त्यांचे प्रश्न आम्हाला लेखी द्यावेत आणि आम्ही यावर चर्चा करू. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आमची बैठक अर्थपूर्ण होती. आम्ही नेत्यांना छोटे गट तयार करण्याचे आवाहन केले आहे आणि प्रत्येक कलमावर सविस्तर चर्चा करण्याचा पर्याय सूचवला. सरकार कोणत्याही चर्चेला तयार आहे. ३ डिसेंबरला चौथ्या फेरीची चर्चा होईल, असेही केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
20:41 December 01
दिल्लीत सरकारकडून शेतकरी नेत्यांसोबत बैठका सुरूच
दिल्ली- केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पीयूष गोयल यांनी कृषी भवन येथे हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरी नेत्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीला भारतीय किसान युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
19:15 December 01
आंदोलन स्थगित करून पुढील चर्चेला येण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन
दिल्ली- शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलन स्थगित करून पुढील चर्चेला यावे, असे आवाहन आम्ही शेतकऱ्यांना, शेतकरी नेत्यांना केले. तथापि, हा निर्णय शेतकरी संघटना आणि शेतकरी यांच्यावर अवलंबून आहे. आजची बैठक चांगली होती, 3 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होईल. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे छोटे गट चर्चेसाठी यावेत असे आमचे म्हणणे होते. मात्र, सर्वांसोबत चर्चा व्हायला हवी अशी त्यांची मागणी आहे, आम्हाला त्यात काही अडचण नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
19:05 December 01
सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार
दिल्ली- नव्या शेतकरी कायद्यांविरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. ३ डिसेंबरला सरकारने बोलवलेल्या बैठकीसाठी आम्ही पुन्हा येऊ, असे दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेणारे शेतकरी प्रतिनिधी मंडळाचे सदस्य चंदा सिंह बैठकीनंतर म्हणाले.
आजची बैठक चांगली होती आणि चर्चेत थोडी प्रगतीही झाली आहे. 3 डिसेंबर रोजी सरकारशी होणाऱ्या पुढच्या बैठकीत आम्ही त्यांना खात्रीशीर पटवून देऊ की, नवीन कायद्यातील कोणतेही कलम शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे अखिल भारतीय किसान महासंघाचे अध्यक्ष प्रेमसिंह भांगू म्हणाले.
19:01 December 01
शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात विज्ञान भवन येथे सुरू असलेली बैठक संपली
दिल्ली- शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात विज्ञान भवन येथे सुरू असलेली बैठक संपली; 3 डिसेंबरला आणखी एक बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.
18:18 December 01
छायाचित्रांमध्ये दिसणारे बरेच लोक शेतकरी नाहीत - केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह
दिल्ली- छायाचित्रांमध्ये दिसणारे बरेच लोक शेतकरी असल्याचे दिसत नाही. शेतकर्यांच्या हिताचे त्यांनी काहीही केलेले नाही. शेतीविषयक नव्या कायद्याची मूळ शेतकऱ्यांना काहीच समस्या नाही. विरोध करणारे कमिशन मिळवणारे लोक आहेत, शेतकरी नव्हेत, असे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह म्हणाले.
18:13 December 01
चिल्ला सीमा (दिल्ली-नोएडा लिंक रोड) बंद करण्यात आला
दिल्ली- शेतकरी आंदोलनावेळी दिल्ली ते यू.पी. लिंक रोड रोखून धरल्याने चिल्ला सीमा (दिल्ली-नोएडा लिंक रोड) बंद करण्यात आला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी नोएडाला जाणाऱ्या प्रवाशांना गाझीपूर/अक्षरधाम उड्डाण पुलावरून यू-टर्न घेऊन सराई काळे खान मार्गावरून जाण्याची विनंती केली आहे.
17:22 December 01
दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये सरकारची शेतकरी नेत्यांशी चर्चा सुरू
दिल्ली- हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) अधिनियमाबद्दल सरकारकडून शेतकरी नेत्यांना सविस्तर सादरीकरण देण्याचे काम सुरू आहे. विज्ञान भवन येथे ही बैठक चालू आहे. आपण आपल्या संस्थांमधील 4-5 लोकांची नावे द्या आणि एक समिती स्थापन करा, त्यांच्याशी नवीन कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी तसेच कृषी तज्ञ असतील, असा प्रस्ताव सरकाकडून देण्यात आला आहे.
17:08 December 01
अन्यथा दुचाकीने दिल्लीत जाऊन आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा
अमरावती- कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन तारखेपर्यंत दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही तर, आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन बैतुलमार्गे दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार, असा इशारा बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना दिला.
16:33 December 01
हमीभाव कायम राहणार, सरकारी अधिकारी लिहून देतील.. मग अडचण काय?
शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव कायम आहे. तो रद्द केला जाणार नाही, असे सरकारी अधिकारी तुम्हाला लिहून देऊ शकतात, मग नव्या शेतकरी कायद्याला विरोध करण्याचे कारण काय? असा प्रश्न जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) संस्थापक अजय चौटाला यांनी विचारला आहे.
16:18 December 01
... निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटवू - राजू शेट्टी
कोल्हापूर- शेतकर्यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटवून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात बोलत होते. राजू शेट्टी यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन मोठी झटापट उडाली.
16:12 December 01
'स्वाभिमानी'चा दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा; पुतळा जाळून केले केंद्र सरकारविरोधात आंदोलन
नागपूर -दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.
13:27 December 01
अपक्ष आमदाराने हरियाणा सरकारचे समर्थन घेतले मागे..
हरियाणाच्या चरखी दादरी म्हणून निवडून आलेले अपक्ष आमदार सोमबीर सांगवान यांनी हरियाणा सरकारला दिलेले समर्थन मागे घेतले आहे. यापूर्वी त्यांनी पशुधन विकास बोर्डाच्या चेअरमन पदाचाही राजीनामा दिला होता. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
13:21 December 01
सिंघू सीमेवर पोहोचला ३०० ट्रॅक्टर्सचा ताफा..
दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी येतच आहेत. आज आंदोलनाच्या सहाव्या दिवशी सुमारे ३०० ट्रॅक्टर्सचा ताफा सीमेवर पोहोचला. याठिकाणी पूर्वीपासूनच २५ ते ३० हजार शेतकरी हजर आहेत, आणि दररोज याठिकाणच्या शेतकऱ्यांची संख्या वाढतच आहे.
13:17 December 01
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडूंचाही मोर्चा..
कृषी विधेयक कायद्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत तीन तारखेपर्यंत दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही, तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन बैतुल मार्गे दिल्लीला जाऊ असा इशारा बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना दिला. यानंतर या मोर्चाबाबतची माहितीही त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.
12:54 December 01
दुपारच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजनाथ सिंह..
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास शेतकरी संघटनांशी होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असणार आहेत.
11:22 December 01
स्वाभिमानीचे केंद्राविरोधात आंदोलन..
नागपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले.
11:17 December 01
जे. पी. नड्डांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक..
आज दुपारी शेतकरी संघटनांशी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री अमित शाह हे याठिकाणी दाखल झाले आहेत.
11:14 December 01
ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी काढतायत बॅरिकेट्स..
दिल्ली-उत्तरप्रदेश बॉर्डरवर पोलिसांनी लावण्यात आलेले बॅरिकेट्स काढून टाकण्यासाठी येथील शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करताना दिसून येत आहेत.
08:23 December 01
५०० संघटनांना आमंत्रण द्या तरच चर्चा; किसान संघर्ष समीतीचा इशारा..
देशभरात ५००हून अधिक शेतकरी संघटना आहेत. मात्र, सरकारने केवळ ३२ संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. बाकी शेतकरी संघटनांना जोपर्यंत चर्चेसाठी आमंत्रण दिले जात नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही असा इशारा पंजाब किसान संघर्ष समितीचे सहसचिव सुखविंदर एस. सभ्रण यांनी दिला आहे.
08:22 December 01
टिकरी सीमेवरील वाहतूकही बंद..
सिंघू सीमेप्रमाणेच टिकरी सीमेवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. यासोबत, बदुसराई आणि जाटीकारा सीमांवर केवळ दुचाकी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.
08:20 December 01
सिंघू सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली; वाहतूक बंद..
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
08:19 December 01
आज दुपारी तीन वाजता बैठक..
केंद्राने अखेर शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवत, ३२ कृषी संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक पार पडणार आहे.
08:05 December 01
शेतकऱ्यांच्या ३२ संघटनांशी चर्चा करण्यास सरकारची तयारी..
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने अखेर कृषी संघटनांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी काही अटी घातल्या होत्या. ज्या फेटाळत शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले होते.