नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना लशीच्या कमतरतेबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने कोरोना लशीचा फॉर्म्युला सार्वजनिक करावा, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लशीचा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर अनेक कंपन्यांना लशींचे उत्पादन वाढविणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, की देशातील केवळ दोन कंपन्यांकडून लशींचे उत्पादन घेण्यात येत आहे. या कंपन्या महिन्याभरात केवळ ६ ते ७ कोटी लशींचे उत्पादन घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. तोपर्यंत अनेक लाटा येणार आहेत. त्यामुळे कोरोना लशींचे युद्ध पातळीवर उत्पादन वाढविणे महत्त्वाचे आहे. सर्वांचे लसीकरण करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन करणे आवश्यक असल्याचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
हेही वाचा-तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की संकटात अनेक कंपन्यांना पीपीई कीटचे उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे लशींचे उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात यावे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.