नवी दिल्ली :प्रदुषणाच्या महाभयंकर समस्येचा सामना करणाऱ्या राजधानी नवी दिल्लीत देशातील पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी या स्मॉग टॉवरचे लोकार्पण केले. या स्मॉग टॉवरच्या सहाय्याने एक किलोमीटर क्षेत्रातील हवा शुद्ध केली जाईल असे सांगितले जात आहे.
दिल्लीकरांना घेता येईल मोकळा श्वास
दिल्लीकरांना प्रदुषणापासून मुक्तता मिळून शुद्ध हवेत श्वास घेता यावा या दृष्टीने दिल्ली सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या राजधानी दिल्लीत देशातील पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या स्मॉग टॉवरचे सोमवारी लोकार्पण केले. यावेळी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्यासह अधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
दिल्लीत उभारला देशातील पहिला स्मॉग टॉवर; केजरीवालांनी केले लोकार्पण अमेरिकेतून आणला स्मॉग टॉवर
हा स्मॉग टॉवर दिल्लीच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. हा स्मॉग टॉवर अमेरिकेतून आणण्यात आला आहे. याचे डेटा मॉनिटरींग आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईकडून केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
1 किलोमीटर क्षेत्रातील हवेचे शुद्धीकरण
या स्मॉग टॉवरला एकूण 40 पंखे लावण्यात आलेले असून याच्या सहाय्याने एक किलोमीटर क्षेत्रातील हवा शोषून ती शुद्ध केली जाईल. दिल्ली प्रदुषण नियंत्रण समिती या प्रकल्पाची नोडल एजन्सी असेल. टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने हा प्रकल्प उभारला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेडने यासाठी समन्वय केला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा -तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : आज 146 नागरिकांना भारतात सुरक्षित आणलं