नवी दिल्ली :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शनिवारी कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले. कुस्तीपटूंच्या या आंदोलनात संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, आमच्या कुस्तीपटूंनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून त्यांना आंदोलन करावे लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे असही ते म्हणाले आहेत. दुपारी ४ वाजता केजरीवाल जंतरमंतरवर पोहोचले. याचवेळी ते म्हणाले आमच्या समाजात महिलांना पुढे येण्यापासून रोखले जाते. पण आमच्या मुलींनी देशाचं नाव कमावलं आहे. जो दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. संपूर्ण देश आंदोलक पैलवानांच्या पाठीशी उभा आहे. दिल्ली सरकारही त्यांच्यासोबत आहे असही ते म्हणाले आहेत.
एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात : यावेळी केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकार बदमाशांना संरक्षण देत असल्याचा थेट आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले की भाजपच्या एकाही माणसाने चूक केली तर भाजपची संपूर्ण यंत्रणा त्याला वाचवण्यात गुंतलेली असते. तसेच, भाजपमध्ये जर कोणी चुकीचे काम केले, कुणी बलात्कार केला तर लोकांना एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.