केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीत आंदोलन करत असून सिंघू आणि टिक्री सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरले आहेत. शेतकऱ्यांनी उत्तर दिल्लीतील बुरारी येथील संत निरंकारी मैदानावर आंदोलन करावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. पंजाब आणि हरयाणातून मोठ्या प्रमाणात शेतकरी सिंघू सीमेवर जमा होत असून पोलीसांचाही फौजफाटा तेथे तैनात आहे.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे 'दिल्ली चलो' आंदोलन ; पाहा LIVE अपडेट्स.. - कृषी कायद्याविरोधी आंदोलन
17:26 November 28
सिंघू टिक्री सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी
14:26 November 28
सिंघू सीमेवरच होणार आंदोलन..
दिल्ली सरकारने बुरारी परिसरात आंदोलनाची परवानगी दिल्यानंतरही, शेतकऱ्यांनी सीमेवर ठिय्या मांडला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या २९ संघटनांनी एकत्र येत सिंघू सीमेवरच हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
14:04 November 28
दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी..
हजारो शेतकरी राजधानीच्या सीमेवर पोहचले आहेत. हरयाणा पोलिसानी पंजाबनजीकच्या सीमेवरील आणि दिल्लीकडे जाणाऱ्या महामार्गावरील सर्व गतीरोधक हटवले आहेत. काही शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तर काही शेतकरी उत्तर दिल्लीतील मैदानात शांततेने आंदोलन करत आहेत.
12:56 November 28
शेतकरी आंदोलकांशी साधला संवाद
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अर्शदीप कौर यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
12:53 November 28
दिल्ली-यूपी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात..
उत्तर प्रदेशमधील शेतकरी आज दिल्ली सीमेवर पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली-यूपी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पाहूयात तेथील आढावा..
12:51 November 28
सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या; दहा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी..
सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तयार झाली आहे. याठिकाणी तब्बल दहा किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
12:47 November 28
अग्निशामक दलाच्या गाडीवर चढत तरुणाने पोलिसांवरच केला पाण्याचा मारा..
शेतकरी आंदोलकांना थांबवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस वॉटर कॅननचा वापर करत आहेत. मात्र, आज एका तरुणाने चक्क अग्निशामक दलाच्या गाडीवर चढत, पोलिसांवरच पाण्याचा मारा केला. या तरुणाचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे.
09:51 November 28
टिकरी सीमेवर सुरक्षा व्यवस्था तैनात..
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टिकरी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
09:48 November 28
दहा वाजता ठरणार जागा..
दहा वाजताच्या सुमारास शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. यामध्ये ते पुढील आंदोलन सिंघू सीमेवर करायचे, की बुरारीमध्ये याबाबत निर्णय घेतील.
09:46 November 28
शेतकरी सिंघू सीमेवरच बसून..
दिल्ली सरकारने परवानगी दिल्यानंतरही शेकडो शेतकरी सिंघू सीमेवर बसून आहेत. याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
09:45 November 28
दिल्ली सरकारने दिली परवानगी..
आंदोलकांना दिल्लीतील बुरारी परिसरातील निरंकारी समागम मैदानावर आंदोलनास परवानगी देण्यास आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिली. या निर्णयाचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी स्वागत केले. यानंतर टिकरी सीमामार्गे आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश केला.
09:05 November 28
दिल्ली चलो आंदोलनाचा तिसरा दिवस..
नवी दिल्ली -चलो दिल्ली आंदोलनाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रस्त्तांवर आले होते. हरियाणा सरकारकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही शेतकरी दिल्लीच्या दिशेने पुढे आले. सरकारने चर्चेसाठी तीन डिसेंबरची वाट न पाहता, तातडीने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी. अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.