नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज २६वा दिवस आहे. यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार केला आहे. यासोबतच २५ ते २७ डिसेंबरपर्यंत हरियाणाच्या सर्व महामार्गांवरील टोल वसूली करु देणार नसल्याचेही आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे ५०० कृषी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. तसेच, कित्येक विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
शेतकरी दिनादिवशी उपवासाचे आवाहन..
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले आहे, की २३ डिसेंबरला दुपारचे जेवण टाळून शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवावा. यादिवशी शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच शेतकरी दिन साजरा करणार आहेत.