नवी दिल्ली Delhi Bus Fire : जयपूरवरुन दिल्लीला येणाऱ्या खासगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना जयपूर दिल्ली महामार्गावर गुरुग्रामच्या सिग्नेचर टॉवरजवळ बुधवारी रात्री घडली. या बसमधील 10 ते 12 प्रवासी गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.
आगीत बस जळून खाक :जयपूर दिल्ली महामार्गावर बुधवारी रात्री एक खासगी प्रवासी गुरुग्राममधील सिग्नेचर टॉवरजवळ असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचली असता, बसला आग लागली. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी प्रवास करत होते. आगीची माहिती मिळताच प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यासाठी धावपळ झाली. मात्र आगीनं रौद्ररुप धारण केल्यामुळे प्रवाशांना तत्काळ खाली उतरता आलं नाही. त्यामुळे 10 ते 12 प्रवासी गंभीर झाले, तर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होईपर्यंत ही प्रवासी बस जळून खाक झाली होती.