नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन दिल्लीत करण्यात आले आहे. मात्र या बैठकीत भारताने चीनला चांगलाच खमक्या संदेश दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इतर देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी हस्तांदोलन केले. मात्र चीनच्या संरक्षण मंत्र्यांना त्यांनी दुरुनच हात जोडले. त्यांच्या या कृतीतून चीनला जो संदेश द्यायचा होता, तो बरोबर पोहोचला आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे.
या देशांचे संरक्षण मंत्री झाले परिषदेत सहभागी :झपाट्याने बदलणारी सुरक्षा परिस्थिती, अफगाणिस्तानमधील घडामोडींसह दहशतवाद आणि अतिरेक्यांचे हल्ले वाढले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) स्थापन करण्यात आली आहे. या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची परिषद आज राजधानी दिल्लीत होत आहे. त्यामुळे विविध विषयावर चर्चा होऊ शकते. चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू, ताजिकिस्तानचे संरक्षण मंत्री कर्नल जनरल शेराली मिर्जो, इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रेझा घराय अष्टियानी आणि कझाकिस्तानचे संरक्षण मंत्री कर्नल जनरल रुस्लान झाक्सिलनिकोव्ह या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
राजनाथ सिंह यांनी केली ली शांगफू यांच्याशी चर्चा :संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानचे संरक्षण मंत्रीही सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आभासी पद्धतीने बैठकीत सहभागी होऊ शकतात. मात्र या बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांनी ली शांगफू, कर्नल जनरल झाक्सिलनिकोव्ह आणि कर्नल जनरल मिर्झो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ब्रिगेडियर जनरल अष्टियानी यांच्याशीही त्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली.