चंबळच्या राजकारणामध्ये इतिहासात जे काही घडले, त्यामध्ये कायम दिल्लीचा हात राहिला आहे. कित्येक वर्षांपूर्वी दिल्लीमधील तोमर काळाचा अंत झाला होता. तोमर वंशातील लोकांनी खोऱ्यामध्ये आसरा घेत आपला जीव वाचवला. त्याचवेळी धौलपूरच्या सामंतालाही मालवाच्या शासकांनी पदच्युत केले होते. अशात, धौलपूरच्या राजकुमाराने बंडखोरी केली. आपल्या अधिकारांसाठी त्याने चंबळमध्ये आसरा घेतला. तेथील लोकांनी त्याला आपल्या अधिकारांसाठीच्या लढाईमध्ये पूर्णपणे सहकार्य केले. इथूनच चंबळचे बंडखोरीशी नाते जोडले गेले, असे म्हणतात.
'महालात' राहणाऱ्यांनी यापूर्वी कधीही बंडखोरीचे समर्थन केले नव्हते. उलट बंडखोरी करणाऱ्यांचे दमन कशाप्रकारे करता येईल याकडेच या महालातील लोकांचा कल राहिला आहे. मात्र, आताच्या काळात महालात राहणाऱ्या लोकांनीही बंडखोरी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशीच बंडखोरी दाखवत ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. अखेर, तेही चंबळमध्येच वाढलेले आहेत. यावेळीही बंडखोरीचे कारण 'दिल्ली' मधील काँग्रेस ठरले. सिंधिया जेव्हा भाजपमध्ये आले, तेव्हा एकूण २२ आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. यामधील १९ आमदार सिंधियांच्या गटातील होते.
चंबळच्या लोकांनी इतिहासात तर राजकुमाराला पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी बंडखोरी करणाऱ्याच्यामागे चंबळचे लोक उभे राहतील का? हा प्रश्न निवडणुकांच्या निकालापूर्वी सर्वांनाच पडला होता. त्यातच प्रचाराला आलेल्या कमलनाथांनी सिंधियांच्या बंडखोरीला 'गद्दारी' म्हणत, चंबळच्या लोकांना त्यांचा पाठिंबा न देण्याचे आवाहन केले होते. मात्र, कमलनाथ चंबळच्या लोकांना ओळखायला चुकले, असंच निकालानंतर म्हणायला हवं. कारण, चंबळच्या लोकांनी पुन्हा एकदा बंडखोरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. सिंधियांना समर्थन देणाऱ्या १९ पैकी १३ आमदार पुन्हा निवडून आले आहेत. बंडखोरी केलेल्या एकूण १५ जागांपैकी काँग्रेसला सातच जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांना या निवडणुकीत विजय मिळाला आहे.
या आमदारांची बंडखोरी जनतेला मान्य..
काँग्रेसशी बंडखोरी करुन, भाजपच्या तिकीटावर ग्वाल्हेर मतदारसंघातून उभे असणाऱ्या प्रद्युम्न सिंह यांना लोकांनी विजयी केले आहे. तसेच, अंबाह मतदारसंघातून कमलेश जाटव सुमारे १४ हजार मताधिक्याने निवडून आले. भांडेरमध्ये रक्षा सिरोनिया यांना १६१ मतांनी निसटता विजय मिळाला. तर, मेहगांवमधून ओपीएस भदौरिया यांना विजय मिळाला. पोहरी मतदारसंघातून सुरेश धाकडे हे २२ हजार मतांनी निवडणून आले. याठिकाणी काँग्रेस तिसऱ्या स्थानी पोहोचली. तर मुंगावली मतदारसंघातून बृजेंद्र सिंह यादव निवडून आले. हा त्यांचा सलग तिसरा विजय होता.
बमोरी मतदारसंघातून निवडून आलेल्या महेन्द्र सिंह सिसोदिया यांना तब्बल ५३ हजार मताधिक्य मिळाले. यापूर्वी ते काँग्रेसमधून निवडून आले होते, तेव्हा त्यांना केवळ २७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. म्हणजेच, लोकांनी त्यांना भाजपमध्ये असताना जास्त पाठिंबा दिला. तर, अशोकनगर मतदारसंघातून जजपाल सिंह यांना लोकांनी निवडून दिले. मागील वेळी त्यांनी भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले होते. तर यावेळी भाजपकडून उभे राहत त्यांनी काँग्रेसचा पत्ता साफ केला आहे.