अहमदाबाद (गुजरात): मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात विद्यापीठाने पंतप्रधान मोदींची पदवी मागितल्याप्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात अहमदाबाद न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांच्याविरोधात समन्स जारी केले आहेत. अहमदाबादच्या फौजदारी न्यायालयाने एका याचिकेवर दोन्ही नेत्यांविरोधात हे समन्स बजावले आहे. विद्यापीठाच्या सरचिटणीसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे गुजरात विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे.
गुजरात विद्यापीठावर प्रश्नचिन्ह:याचिकाकर्त्यांचे वकील अमित नायर म्हणाले की, 31 मार्च रोजी गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीशी संबंधित कागदपत्रे देऊ नयेत, असा आदेश दिला. यानंतर, 1 एप्रिल रोजी अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी आणि गुजरात विद्यापीठाबद्दल ट्विटर तसेच इतर माध्यमांवर चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशीही त्यांनी गुजरात विद्यापीठावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची कागदपत्रे यापूर्वीच गुजरात विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत.