बेंगळुरू:कोवई रहमाथुल्ला यास तिरुनेलवेली येथून अटक करण्यात आली, तर एस. जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजौर येथून ताब्यात घेण्यात आले आहे . शनिवारी रात्री या दोघांवरा अटकेची कारवाई करण्यात आली. आरोपी तामिळनाडूच्या तौहीद जमातचे (टीएनटीजे) पदाधिकारी आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये या आरोपींविरुद्ध अनेक तक्रारी आल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि खाजी जैबुन्नेसा मोहियुद्दीन यांचा समावेश असलेल्या विशेष खंडपीठाने वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळताना, हिजाब घालणे हा इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही हे अधोरेखित केले होते. तामिळनाडूतील अनेक संघटना या निकालाविरोधात निदर्शने करत आहेत. आरोपी कोवई रहमाथुल्लाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तो कर्नाटकच्या न्यायाधीशांविरुद्ध भडकपणे व्यक्त होत आहे. त्याने बोलताना गेल्या वर्षी झारखंडमधील एका जिल्हा न्यायाधीशाची मॉर्निंग वॉकला असताना हत्या केल्याचा उल्लेख केला आहे. कर्नाटकचे सरन्यायाधीश सकाळी फिरायला कुठे जातात हे लोकांना माहीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.