संत गाडगे बाबा (Sant Gadge Baba) म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार (Sant Gadge Baba Maharashtra kirtankar), संत आणि समाजसुधारक (social reformer Sant Gadge Baba) होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. 20 डिसेंबर मंगळवार रोजी त्यांची पुण्यतिथी (Death anniversary of Sant Gadge Baba) आहे.
महत्वाची त्रिसुत्री : संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.
देव देवळात नाही, माणसात शोधा : गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. 'तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |' असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. 'देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका', अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.