नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. या लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरीच थांबणे बंधनकारक होते. लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी 80 आणि 90 च्या दशकातील जवळपास सर्वच मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. प्रसार भारतीच्या दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ यांच्या डिजिटल वाहिन्यांनी सर्व रेकार्ड तोडले आहेत.
ग्राहक संख्येत 2020 या वर्षात 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या वाहिन्यांना एक अब्जांहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत. सहा अब्जांहून अधिक डिजिटल मिनीटे या वाहिन्या पाहिल्या गेल्या. या वाहिन्या सर्वांत जास्त भारतामध्ये पाहिल्या गेल्या असल्या तरी पाकिस्तानमध्येही या वाहिन्यांचा मोठा ग्राहकवर्ग आहे. या डिजिटल वाहिन्यांच्या ग्राहक संख्येत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.