महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Swati Maliwal Interview : दिल्लीच्या 'रेप कॅपिटल' बिरुदावलीस केंद्रसरकार जबाबदार - स्वाती मालीवाल यांची ईटीव्ही भारतला खास मुलाखत - राष्ट्रपती राजवट

मणिपूर येथील महिलांना विवस्त्र करुन अत्याचार केल्याच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीची 'रेप कॅपिटल' अशी ओळख झाल्याचा हल्लाबोल स्वाती मालीवाल यांनी केला आहे. मणिपूर भेटीवरुन परत आल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी ईटीव्ही भारतसोबत खास बातचीत केली आहे.

Swati Maliwal Interview
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल

By

Published : Aug 4, 2023, 1:56 PM IST

Updated : Aug 4, 2023, 2:40 PM IST

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेच मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करुन फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण देश हादरला. मणिपूर हिंसाचारावर विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्यात व्यग्र आहे. दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या पथकासह मणिपूरला भेट दिली आहे. मणिपूरला भेट दिल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. या मुलाखत स्वाती मालीवाल यांनी दिल्लीची 'रेप कॅपिटल' अशी ओळख झाल्यामुळे ही शरमेची बाब असल्याचे स्पष्ट केले. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही स्वाती मालीवाल यांनी केला.

स्वाती मालीवाल यांची ईटीव्ही प्रतिनिधी शशिकला सिंह यांनी घेतलेली मुलाखत

प्रश्न : तुम्ही नुकत्याच मणिपूरहून परत आला आहात. याबाबत तुम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?

उत्तर : मणिपूरची परिस्थिती अतिशय वाईट असून अगोदर तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी स्वाती मालीवाल यांनी केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा घ्यावा, असेही स्वाती मालीवाल यांनी यावेळी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना मणिपूरला पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे. मणिपूरमध्ये महिलांवर होत असलेल्या हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारांची कारणे शोधण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची मागणीही स्वाती मालीवाल यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून मणिपूर हिंसाचार प्रकरणावर देखरेख ठेवून मणिपूरमधील हिंसाचार पीडितांसाठी तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी करण्याची मागणीही स्वाती मालीवाल यांनी केली.

प्रश्न : दिल्लीत तीन ठिकाणी महिलांचा खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचार कसे रोखता येतील ? निर्भयाच्या घटनेनंतर दिल्ली महिला आयोग खूप चर्चेत होता. सरकारने अनेक आश्वासने देऊनही दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत. यामागे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?

उत्तर : निर्भया घटनेला 10 वर्षे पूर्ण झाली असून त्यावेळी मी विरोधही केला होता. तेव्हा मला पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या आहेत. यापुढे निर्भयासारखी घटना पुन्हा होऊ दिली जाणार नाही, असा दावा त्यावेळच्या केंद्र आणि राज्य सरकारने केला होता. मात्र आजही बलात्काराच्या घटना बातम्यांमधून वाचायला मिळतात. फक्त पीडित महिला किंवा मुलींची नावे बदलत असून परिस्थिती जैसे थे आहे. मी जेव्हापासून दिल्ली महिला आयोगाची अध्यक्ष झाले, तेव्हापासून केंद्र सरकारकडे दिल्ली पोलिसांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. राजधानीत महिलांवरील हिंसक घटना वाढत आहेत. मात्र ते थांबवण्यासाठी एकही बैठक घेतली जात नाही. त्यामुळे महिलांशी संबंधित हिंसक घटना रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही स्वाती मालीवाल यांनी केली.

प्रश्न : उच्चस्तरीय समितीमध्ये कोणाचा समावेश करावा असे तुम्हाला वाटते ?

उत्तर : राजधानीतील महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली महिला आयोगाचा या समितीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी स्वाती मालीवाल यांनी केली. महिलांशी संबंधित प्रश्नांवर महिन्यातून एकदा चर्चा व्हायला हवी, असेही स्वाती मालीवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रश्न : दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत दिल्ली महिला आयोगाची काय योजना आहे?

उत्तर : दिल्ली महिला आयोग महिलांच्या सुरक्षेसाठी 24 तास काम करत असल्याचा दावा स्वाती मालीवाल यांनी केला. दिल्ली महिला आयोगाच्या हेल्पलाइन 181 वर दररोज 2 हजार ते 4 हजार कॉल येतात. दिल्ली महिला आयोगाची टीम कोणत्याही पीडित महिलेला भेटते. 6 वर्षात महिला आयोगाने 1 लाखांहून अधिक महिलांच्या तक्रारीवर सुनावणी घेतल्याचे स्वाती मालीवाल यांनी यावेळी सांगितले आहे. यापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी 8 वर्षात केवळ एका खटल्याची सुनावणी केली होती, असा दावाही स्वाती मालीवाल यांनी यावेळी केला. मात्र दिल्ली महिला आयोगाच्या सततच्या प्रयत्नांनंतरही दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचे स्वाती मालीवाल यांनी यावेळी सांगितले.

प्रश्न : दिल्ली महिला आयोगाच्या प्रयत्नांनंतरही महिला सुरक्षित नाहीत, याला जबाबदार कोण आहे?

उत्तर :सध्या दिल्लीला रेप कॅपिटल म्हणून ओळखले जात आहे. ही अत्यंत शरमेची बाब असून यासाठी मी थेट केंद्र सरकारला दोष देत असल्याचे स्वाती मालीवाल यांनी सांगितले. 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला तेव्हा मी 10 दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर केंद्र सरकारने कायदा आणल्याचे त्या म्हणाल्या. यामध्ये लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिली जाईल, अशी तरतूद आहे. मात्र दीड वर्षानंतर पुन्हा उपोषणाला बसावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायदा आला, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असा दावाही स्वाती मालीवाल यांनी केला.

प्रश्न : दिल्ली महिला आयोगात महिलांवरील कोणत्या अत्याचाराची प्रकरणे अधिक दाखल होतात ?

उत्तर : घरगुती हिंसाचाराच्या सुमारे 60 ते 70 टक्के प्रकरणे दिल्ली महिला आयोगात दाखल होतात. याशिवाय बलात्कार, लैंगिक हिंसा, सायबर गुन्हेगारी, फसवणूक आदी प्रकरणेही दाखल होत असल्याचे स्वाती मालीवाल यांनी यावेळी सांगितले. दिल्ली महिला आयोगाने हजारो मुलींचे मानवी तस्करांपासून संरक्षण केले आहे. तसेच घरकामगार असलेल्या महिलांवर अत्याचाराची प्रकरणे दाखल आहेत. दिल्ली महिला आयोग सातत्याने महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे, मात्र केंद्र सरकारला कधी जाग येणार? असा सवालही स्वाती मालीवाल यांनी यावेळी सरकारला केला आहे.

हेही वाचा-

  1. Manipur Violence: दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखांना मणिपूर सरकारने नाकारली परवानगी.. नियोजनाप्रमाणे दौरा करण्याचा निर्धार
Last Updated : Aug 4, 2023, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details