कोलकाता - देशभर कोरोना संक्रमणाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र, यातच काही ठिकाणी 'बनावट' लसीकरण केंद्रांचा काळाबाजार समोर आला आहे. या बनावट लसीकरणाला तृणमूल काँग्रेस खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मिमी चक्रवर्ती बळी पडल्या. लस घेतल्याच्या चार दिवसांनी मिमी चक्रवर्ती आजारी पडल्या होत्या.
खासदार मिमी चक्रवर्ती यांना कथित आयएएस अधिकाऱ्याकडून लसीकरण शिबिरासाठी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. ट्रान्सजेंडर आणि अपंगांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित केल्याचे त्याने मिमी यांना सांगितले. आयएएस अधिकारी असल्याचं सांगून लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी तत्सम व्यक्तीने मिमी यांनाही लस घेण्याची विनंती केली. ही लस घेतल्यानंतर मोबाइलवर संबंधित कोणताही अधिकृत संदेश मिळाला नाही. यानंतर मिमीला संशयास्पद वाटलं आणि त्यांनी पोलिसांना त्याविषयी माहिती दिली. यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
बनावट लसीकरणाला बळी पडलेल्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या प्रकृती खालावत असल्याची माहिती आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास झाला. डॉक्टरांनी मिमी चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, सध्या घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.