हैदराबादDatta Jayanti 2023 -पौराणिक कथांनुसार, अनसूयेला अत्री ऋषींपासून झालेले पुत्र म्हणजे भगवान दत्तात्रय अथवा दत्त आहेत. दत्त हे ब्रम्ह, विष्णू, शिव यांची शक्ती असलेले दैवत मानले जातात. त्यांची बहुतांशी ठिकाणी 'त्रिमूर्ती' म्हणजे त्रिमुखे असलेल्या स्वरुपात पुजा केली जाते. तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताची मूर्तीचं पूजन केलं जातं. दत्ताला 'अवधूत' असंदेखील म्हटलं जातं. दत्ताचे चोवीस गुरू मानले जातात.
कोल्हापूर, माहूर आणि औदुंबर या ठिकाणी दत्ताचा वावर असल्याचं मानलं जातं. दत्तात्रयानं विविध सोळा अवतार घेतल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामध्ये श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी आणि माणिक प्रभू यांचा समावेश आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. साईबाबांना दत्त अवतार मानलं जाते. गुरू परंपरेतून नवनाथ आणि इतर पंथांचा प्रसार झाल्याचं मानलं जातं. सनातन धर्म संकटात असताना धर्माची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केल्याचा उल्लेख विविध ग्रंथात आढळतो.
अशी करावी दत्ताची उपासना-योगसाधनेचे साधक हे दत्ताला योगी मानतात. औदुंबर वृक्षाखाली पद्मासनात स्थित असलेल्या दत्ताचे स्मरण करून साधक ध्यान करतात. सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे 'त्रिमूर्ती दत्त गुरु' मानले जातात. दत्ताची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात. गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना होते. त्रिमुख–षङ्भुज दत्तात्रेयामागे एक गाय व आजूबाजूस चार श्वान आहेत, अशा प्रतिमा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. दत्ताच्या पाठीमागील गाय हे पृथ्वीचं, तर चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक मानले जातात. औदुंबर वृक्षाखाली दत्तात्रयांचा निवास असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे औदुंबर वृक्षाखाली 'गुरूचरित्र' या ग्रंथाचं पारायण केलं जातं.
दत्ताचे हे आहेत मंत्र आणि ग्रंथ-दत्तात्रयांना संबंधित नाथ, महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांत अत्यंत महत्त्व आहे. या पंथातील संत आणि सत्पुरुषांना दत्तात्रयांनीच दृष्टांत आणि ज्ञान दिल्याचे पुराणात उल्लेख आले आहे. अवधूतगीता, त्रिपुरोपास्तिपद्धति व परशुरामकल्पसूत्रम् हे ग्रंथ दत्तप्रणीत मानले जातात. दत्तात्रेयाचे एकाक्षरी, षडक्षरी अष्टाक्षरी, द्वादशाक्षरी व षोडशाक्षरी मंत्र असून ‘दत्तगायत्री’ नावाचाही मंत्र आहे.
हेही वाचा-