महोबा (उत्तर प्रदेश) -एका नवनिर्वाचित दलित महिला सरपंचाला शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या महिला सरपंचाला जबरदस्ती तिच्या खुर्चीवरून उठवून खाली बसण्यास लावले, असाही आरोप या महिलेनं केला आहे. या महिलेने निवडून आल्यानंतर बैठक बोलावली होती, या बैठकीत गावातील काही लोकांनी तिला शिवीगाळ केल्याचं महिलेनं सांगितलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील नाथुपुरा गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच महिलनेने बुधवारी सहाय्यक विकास अधिकारी (एडीओ) पंचायत व गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्या उपस्थितीत पंचायत भवनमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी रामू राजपूतसह गावातील काही प्रभावशाली लोक तिथे पोहोचले आणि सरपंच महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
महिला सरपंचाने सांगितलं की, 'मी सरपंच झाल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेत होते. यावेळी गावातील रामू, रुपेंद्र, अर्जून, रविंद्र आणि इतर सहा जण बैठक सुरू असलेल्या खोलीत आले आणि त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांच्या सूचना ऐकण्यास सांगितलं. मी नकार दिल्यानंतर त्यांनी मला हात पकडून जबरदस्ती खुर्चीखाली उतरवलं आणि जातीवाचक शिव्या देत जमिनीवर बसण्यास सांगितलं.'
दरम्यान, या घटनेनंतर या महिला याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. महोबाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर.के. गौतम म्हणाले, की आरोपी रामू राजपूत आणि त्याच्या साथीदारांवर विनयभंगाच्या हेतूसह मारहाण, अनुसूचित जाती / जमाती अधिनियमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.