लखनऊ :एकीकडे योगी सरकार मिशन शक्ती आणि अँटी रोमियो अभियान जोमाने सुरू असल्याबाबत दवंडी पिटत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. मेरठमध्ये आज समोर आलेल्या घटनेने, योगी सरकारचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. याठिकाणी चार युवकांनी ट्युशनला गेलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला, आणि त्यानंतर तिला जबरदस्ती विषही पाजले. कसेबसे या मुलीने आपल्या घरी पोहोचत कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही मुलगी घरातून ट्यूशनसाठी बाहेर पडली होती. मात्र, रस्त्यातच चार तरुणांनी तिचे अपहरण केले, आणि अज्ञात स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर आरोपींनी याबाबत कुठे बोलल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. शिवाय, जबरदस्ती तिला विष प्राशन करायला भाग पाडले.
गावातील चार युवकांवर आरोप..
याबाबत माहिती मिळताच पोलिस तातडीने रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तसेच आरोपींचा शोध सुरू केला. पीडितेवर बलात्कार झाला की नाही याबाबत पोलिसांनी मौन बाळगले आहे. मात्र, कुटुंबीयांनी गावातील चार तरुणांवर याबाबत आरोप करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.